Bhavan's Logo

My Account | Online Catalogue | Contact Us


Munshi Saraswati Mandir Granthagar
(THE BHAVAN'S LIBRARY)

संस्कृती जोपासणाऱ्या भारतीय विद्या भवनचे मुनशी सरस्वती ग्रंथघर

Bhavan's Library

Newspaper:Samna (Marathi)
Date: December 15, 1996

व्यापारासाठी सातासमुद्रापलीकडून आलेल्या ब्रिटीशांनी संधी मिळताच हिंदुस्थानच्या राज्यकारभारात प्रवेश केला. ‘फोडा आणि झोडा’ या नीतीचा वापर करीत, अत्याधुनिक शस्त्रास्रांसह लढाया करीत संपूर्ण हिंदुस्थान पादाक्रांत केला. ब्रिटीशांपूर्वी हिंदुस्थानवर अनेकांनी आक्रमणे केली. इथल्या राज्यकर्त्यांना पराभूत करून सत्ता हस्तगत केली. पण हळूहळू ते इथल्या मातीशी, संस्कृतीशी एकरूप होऊन गेले. पण इंग्रजांनी इथली संपूर्ण समाजव्यवस्था, प्रशासन व न्यायव्यवस्था बदलून टाकली. नवी शिक्षणपपध्दती अंमलात आणली. इंग्रजी शिक्षण घेतलेली पिढी हिंदुस्थानचा दैदीप्यमान इतिहास वाचून वर्तमान काळाबद्दल विचार करू लागली. एके काळी सुवर्णभूमी असलेला हिंदुस्थान ब्रिटीशांच्या कारकिर्दीत दरिद्री का झाला याची कारणमीमांसा करू लागली.
१८५७ च्या बंडापूर्वी व बंडानंतर हिंदुस्थानमध्ये साहित्य, संस्कृती, इतिहाससंशोधनात विद्वान रस घेऊ लागले. ब्रिटिशांपेक्षा हिंदुस्थानचे लोक हुशार व विद्वान काकणभर वरचढच होते, हे समाजाला समजावून देऊ लागले. त्यातुनच धर्म व सामाजिक सुधारणांची लाट आली.
बंगालमध्ये राजा राम मोहन रॉय यांनी प्रबोधन युगाचा पाया घातला. त्यानंतर स्वामी रामकृष्ण परमहंस, स्वामी विवेकानंद, महर्षी दयानंद सरस्वती, महाऋषी रामण्णा, महायोगी श्री अरविंद घोष यांनी हिंदुस्थानच्या संस्कृतीचा महिमा जनतेला समजाविला. त्यामुळे कर्मकांड व अंधश्रद्धा यांची जळमटे दूर झाली. समृद्ध हिंदू संस्कृतीचा पुनराभ्यास सर्वत्र होऊ लागला. त्यातूनच हिंदुस्थानच्या स्वातंत्र्यचळवळीचा प्रारंभ झाला. दादाभाई नौरोजी, गोपाल कृष्ण गोखले, लोकमान्य टिळक, महात्मा गांधी यांनी स्वातंत्र्यचळवळीला घराघरात नेले. स्वातंत्र्यचळवळीच्या काळात देशात सर्वत्र राष्ट्रीय शिक्षण, संस्कृती यांची वाढ झाली. स्वातंत्र्यचळवळ ऐन भरात आली असताना सुप्रसिद्ध साहित्यिक, देशभक्त, वकिलीचे उच्च शिक्षण घेतलेल्या आणि हिंदुस्थानच्या राजकीय चळवळीत सक्रीय असलेल्या डॉ. कन्हैय्यालाल माणेकलाल मुनशी यांनी ८ नोव्हेंबर १९३८ रोजी भारतीय विद्या भवनाची स्थापना केली. हिंदुस्थानच्या संस्कृतीचे संवर्धन व रक्षण करण्याच्या उदात्त हेतूने व दूरदृष्टीने डॉ. मुनशी यांनी स्थापन केलेल्या या संस्थेच्या ‘मुनशी सरस्वती ग्रंथघरा’ ची माहिती वाचकांना उत्कंठावर्धक वाटेल.

डॉ. मुनशी द्रष्टा, संस्कृती अभिमानी

माणिकलाल आणि तापीबेन यांच्या पोटी गुजरात राज्यातील भडोच येथे ३० डिसेंबर १८८७ रोजी कन्हैय्यालाल यांचा जन्म झाला. अत्यंत तल्लख व तैलबुद्धीच्या कन्हैय्यालालनी १९०१ मध्ये माध्यमिक शिक्षण पूर्ण केले आणि बरोडा येथे महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना योगी अरविंद घोष यांच्या विचाराने प्रभावित झाले. त्यानंतर कन्हैय्यालालजीनी भडोच येथे मोफत वाचनालय सुरु केले. १९०७ च्या सुरत कॉंग्रेस अधिवेशनात ते हजर राहिले. १९१० मध्ये एलएल.बी. ची पदवी घेतल्यानंतर ते मुंबईत आले आणि मुंबई उच्च न्यायालयात त्यांनी वकिली चालू केली. मुंबईत आल्यावर लवकरच कन्हैय्यालाल सांस्कृतिक, साहित्यिक, सामाजिक क्षेत्रात त्यांच्या उत्कृष्ठ कार्यामुळे लवकरच प्रसिद्ध झाले. कन्हैय्यालालजीनी ‘भार्गव’ व ‘यंग इंडिया’ ही मासिके सुरु केली. अॅनी बेझंट यांच्या होमरूल चळवळीतही त्यांनी सक्रिय सहभाग घेतला. १९२७ मध्ये कन्हैय्यालाल मुंबई इलाख्याच्या विधिमंडळाचे सदस्य म्हणून निवडले गेले. गुजरातमधील बार्डोली येथे शेतकऱ्यांच्या चळवळीच्या काळात त्यांनी आमदारकीचा राजीनामा दिला.
मिठावरील कर रद्द व्हावा म्हणून गांधीजींनी पुकारलेल्या मीठ सत्याग्रहात भाग घेतल्याबद्दल १९३० मध्ये कन्हैय्यालालजींनी सहा महिने तुरुंगवास भोगला. त्यानंतर सत्याग्रहात भाग घेतला म्हणून त्यांना १९३२ मध्ये दोन वर्षाची सक्तमजुरीची शिक्षा ठोठावण्यात आली. कॉंग्रेसमधील संभ्रमित वातावरण पाहून १९३३ मध्ये स्थापन झालेल्या स्वराज्य पक्षात ते गेले. लवकरच विधिमंडळावर त्यांची निवड होऊन १९३७ मध्ये ते गृहमंत्री झाले. १९३८ मध्ये त्यांनी भारतीय विद्या भवनची स्थापना केली.
गांधीजींनी पुकारल्याप्रमाणे वैयक्तिक सत्याग्रहात कन्हैय्यालालजीनी सहभाग घेतला. त्याबद्दल त्यांना अटक झाली, पण गंभीर आजारामुळे त्यांची सरकारने सुटका केली. प्रकांडपंडित, हिंदूधर्म शास्त्राचे उपासक असलेले कन्हैय्यालालजी हिंदुस्थानच्या घटनानिर्मितीच्या समितीवर १९४८ मध्ये निवडले गेले. उत्तरप्रदेशच्या राज्यपाल पदावर ते १९५२ ते ५७ या काळात होते. साहित्य, समाजकारण व राजकारण यासाठी आपले सर्व आयुष्य वेचलेल्या डॉ. मुनशी यांचे ८ फेब्रुवारी १९७१ मध्ये निधन झाले. त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ भारतीय विद्या भवनच्या गिरगाव चौपाटीनजीकच्या मुख्य केंद्राचे ‘मुनशी सदन’ असे करण्यात आले. याच मुनशीसदनातील तिसऱ्या मजल्यावर डॉ. मुनशी यांनी स्थापन केलेल्या वाचनालयाची (ग्रंथघराची) माहितीही मोठी महत्वपूर्ण आहे.
डॉ. मुनशी यांनी भवन्सचे कुलपती म्हणून दीर्घकाळ काम पाहिले. भारतीय विद्या भवनने देशभरात अनेक केंद्राचे जाळेच विणले असून शैक्षणिक, सांस्कृतिक, साहित्यिक, प्रकाशन क्षेत्रात सतत भवन्स आघाडीवर राहिले आहे.

समृद्ध ग्रंथभांडार

भारतीय विद्या भवनच्या मुनशी सरस्वती ग्रंथघरामध्ये ८० हजाराहून अधिक ग्रंथ आहेत. धर्मशास्त्र आणि संस्कृत साहित्याचे अनेक दुर्मिळ व अमूल्य ग्रंथ आपल्याला येथे पाहायला मिळतील. ताडपत्रावरील १४०४ अमूल्य संस्कृत व प्राकृतमधील ग्रंथ येथे जतन केले असून त्यांची सूचीही करण्यात आली आहे. ताडपत्रावर लिहिलेल्या या दुर्मिळ ग्रंथाचा अभ्यास व त्यावर संशोधन करण्यासाठी विद्वान, संशोधक, पत्रकार, लेखक, चित्रपटकार व परदेशातूनही अनेक व्यक्ती या ग्रंथालयात येतात. संस्कृत ग्रंथसंग्रहाबाबत मुंबई विद्यापीठ ग्रंथालयानंतर मुनशी लायब्ररीचा नंबर लागतो.
संस्कृतमधील सर्व महत्वाची काव्ये, नाटके, चार वेद, आरण्यके, उपनिषदे, १८ पुराणे, महाकाव्ये (रामायण व महाभारत), स्मृती, वेदावरील टीका, दर्शन येथे संस्कृतप्रेमींची वाट पाहात आहेत. कालिदासाचे सर्व साहित्य व त्यावरील टीकाग्रंथ येथे जतन केले आहेत. प्राचीन भारत कालखंडात हिंदुस्थानला भेटी देणाऱ्या ह्युएन त्सँग, भूगोलाचा संस्थापक टॅालेमी यांनी लिहिलेली प्रवासवर्णने येथे उपलब्ध आहेत. भगवान बुद्धांनी सांगितलेली पाली भाषेतील धम्म पदे व त्रिपीटके येथे पाहावयास मिळतात. त्याचप्रमाणे प्राकृत व अर्धमागधीतील महत्त्वाचे ग्रंथ व कोश आहेत. संस्कृतमधील ‘शब्दचिंतामणी’ हा कोश, वैदिक कोश, अर्धमागधी भाषेचा अभिनव राजेंद्र कोश अभ्यासूंची जिज्ञासा तृप्त करू शकतील.
मराठी, हिंदी, गुजराती, संस्कृत, प्राकृत, पाली, बंगाली, अर्धमागधी या भाषांतील वाङ्मय व विविध विषयांच्या पुस्तकांनी मुनशी सरस्वती ग्रंथघर भरून गेले आहे. चित्रकला, वास्तुशास्त्र व शिल्पकला, भारतीय व जगाचा इतिहास, तत्वज्ञान, खगोलशास्त्र, मानसशास्त्र, पत्रकारिता, तर्कशास्त्र, न्यायशास्त्र, पाश्च्यात्य धर्मशास्त्र, हिंदू व बुध्द यांचे विविध धर्मग्रंथ, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, संगीत या विषयांवरील शेकडो ग्रंथ वाचकांची वाट पाहात आहेत. विविध भाषांतील प्रवासवर्णने, स्थळवर्णने करणारी पुस्तके खूप आहेत.

अमूल्य व दुर्मिळ ग्रंथसंग्रह

मुनशी सरस्वती ग्रंथघरात अप्राचीन काळातील ताडपत्रे, सोळाव्या शतकात प्रसिद्ध झालेले अनेक दुर्मिळ ग्रंथ पाहावयास मिळतात. विशेषतः इतिहास व संस्कृतमधील अनेक दुर्मिळ ग्रंथ येथे आहेत. जोन्स यांनी लिहिलेले फ्रेंच भाषेतील ‘मलबार अॅण्ड कोरोमंडल’ हे १६७२ मध्ये प्रसिद्ध झालेले पुस्तक येथे आहे. प्राचीन काळातील वजनांची माहिती देणारे ‘नुमिस्माना ओरिएंटालिया’ हे १८७४ मध्ये प्रकाशित झालेले एडवर्ड थॉमस यांचे पुस्तक इतिहास- संशोधकांना आकर्षून घेते. याखेरीज जेम्स डफिरन यांचे ‘मॉडर्न आर्ट’ (१८०८) टॉम प्रीमिअर यांचे ‘लेस हिंदूस’ हे फ्रेंच भाषेतील १८ व्या शतकातील पुस्तक अद्यापि सुस्थितीत असून पाहावयास उपलब्ध आहे.

कार्ल व्होग्ट आणि फ्रेडरिक स्थेकट यांचे ‘द नॅचरल हिस्टरी ऑफ अॅनिमल्स्’ हे १८८९ चे तर मेडलीकोट्ट यांचे ‘ए मॅन्युअल ऑफ द जिऑलॉजी ऑफ इंडिया’ हे १८ व्या शतकातील आणि जादूचे तंत्रज्ञान शिकविणारे अलबर्ट हॉपकिन्स यांचे ‘मॅजिक’ (१८९७) हे ग्रंथ वाचकांना गुंगवून ठेऊ शकतील. वृत्तपत्राच्या आकाराचे १८५७च्या स्वातंत्र्ययुद्धाची चित्रे असलेले ‘ग्रीन्स व्ह्यूज ऑफ इंडिया इन द टाइम ऑफ सिमॉय म्यूटिनी’ हे डी. सर्सफिल्ड ग्रीन्स १८५९ सालचे पुस्तक इतिहास संशोधकांसाठी अनमोल ठेवाच आहे. ब्राह्मणाच्या दैनंदिन पूजाअर्चांविषयी माहिती असलेले ‘संध्या’ हे एस. सी. बेलनॉस यांचे १८५१ सालचे पुस्तक अजूनही चांगल्या स्थितीत असून वाचकांसाठी उपलब्ध आहे. सुमारे २०० वर्षापूर्वीचे महाभारताचे हस्तलिखित एका पेटीत उत्तमरीत्या जतन केले आहे.
जगप्रसिद्ध चित्रकारांच्या चित्रांच्या प्रतिकृती असलेले जे. के. चेस्टरटन यांचे फेमस पेंटिंग्ज (१९१२), गेल्या शतकातील ‘द जर्नल ऑफ इंडियन आर्ट’ चे अनेक खंड, हिंदुस्थानातील अलंकारांची माहिती देणारे १९१० मधले ग्रामर ऑफ ऑर्नामेंटस्’ हा ग्रंथ, “ज्यू” च्या नाण्यांविषयी माहिती देणारा फ्रेडरीक मॅडेस यांचा ‘कॉइन्स ऑफ द ज्यूज’ (१९०३) हे व अशी अनेक पुस्तके म्हणजे संशोधकांसाठी उपलब्ध असलेली ज्ञानाची गुहाच आहे.

उत्कृष्ट संदर्भग्रंथ व कोश

भारतीय विद्या भवनच्या या ग्रंथालयाच्या संदर्भ विभागात मराठी विश्वकोश (लक्ष्मणशास्त्री जोशी), केतकरांचा महाराष्ट्रीय शब्दकोश, गुजरातीतील भगवतोमंडल हा विश्वकोश, हिंदी शब्दकोश, संस्कृत व पालीचे शब्दकोश व संस्कृतीकोश वाचकांसाठी उपलब्ध आहेत. तसेच इंग्रजीतील एनसायक्लोपीडिया ब्रिटानिका हा कोष, कविवर्य मोरोपंतांचे, समग्र वाड्मयांचे (१९१६) खंड, इम्पीरियल गॅझेटर्सचे अनेक खंड, जॉर्ज वॅट यांनी लिहिलेली “डिक्शनरी ऑफ इकॉनॉमिक प्रोडक्ट्स ऑफ इंडिया’ या १८९१ मध्ये प्रसिद्ध झालेल्या ग्रंथांचे सहा खंड, महामहोपाध्याय डॉ. पा. वा. काणे यांचा ‘हिस्टरी ऑफ धर्मशास्त्र’ हे ग्रंथ जिज्ञासू वाचकांना लुभावणारे आहेत. ‘इंडियन कल्चर’ हे भारतीय संस्कृतीची माहिती देणारे सहा खंड, द कल्चरल हेरिटेज ऑफ इंडिया, एनसायक्लोपीडिआ ऑफ रिलीजन अॅण्ड एथिक्सचे ९ खंड, द मॅक्मिलन फॅमिली, एनसायक्लोपीडिआ हे व आणखी कित्येक ज्ञानकोश वाचकांच्या ज्ञानात भर घालण्यासाठी उपलब्ध करून दिले जातात.
या मुनशी सरस्वती ग्रंथघरामध्ये राजपुतकालीन व मुघलकालीन शेकडो जलचित्रे पाहावयास मिळतात. कलाक्षेत्रातील अनेक जाणकारांसाठी ही चित्रे म्हणजे पर्वणीच आहे. त्याचबरोबर प्राचीन व अर्वाचीन काळातील शंभराहून अधिक नाणी, छोट्या मूर्ती इतिहासकारांना आकर्षित करून घेतात. कुलपती डॉ. कन्हैय्यालाल मुनशी यांनी देणगी दिलेल्या ग्रंथसंग्रहातूनच आजच्या मुनशी सरस्वती ग्रंथघराची सुरुवात झाली. याशिवाय आजवर आचार्य जीनजीयाजी मुनी, बाबू राजेंद्र सिंग सिंधी, दिवाणबहादूर के. एम झवेरी, डॉ. ए. डी. पुसाळकर आदि नामवतांनी संस्थेला स्वत:चे ग्रंथसंग्रह भेट दिले आहेत. भारतीय विद्या भवनच्या केंद्रीय कार्यालयातील हे ग्रंथालय भवन्सच्या देश-विदेशातल्या केंद्रातील ग्रंथालयांचा विकास करण्यास मदत करते. या ग्रंथालयाला लागूनच लहान मुले व किशोरांसाठी वल्लभजी रामजी बाल पुस्तकालय हे ग्रंथालय असून तेथे ७ हजारहून अधिक पुस्तके आहेत. या ग्रंथालयात ७ ते १५ वयोगटातील मुलांना सदस्यत्व मिळते. पुस्तकाखेरीज कॅरम, बुद्धिबळ व इतर बैठे खेळ येथे मुलांना खेळता येतात. ‘खेळता-खेळता वाचा’ असा या बाल वाचनालयाचा संदेश आहे. सध्या याचा २०० हून आधिक मुले फायदा घेतात.
मुनशी सरस्वती ग्रंथघरात विद्यार्थ्याना अभ्यास करण्यासाठी ‘रीडिंग रूम’ ची उत्तम सोय आहे. त्याचा फायदा घेण्यासाठी दरमहा २० रुपये शुल्क व १०० रुपये अनामत रक्कम द्यावी लागते. कोणालाही पाच हजार रुपये भरून भारतीय विद्या भवनचे आजीव सदस्यत्व मिळते. आजीव सदस्याला भवन्सच्या इतर विविध कार्यक्रमात सहभागी होता येते. आजीव सदस्याला ग्रंथालय सेवा मोफत आहे. या ग्रंथालयाचे दोन हजाराहून अधिक सदस्य आहेत. सर्वसाधारण सदस्याला दरमहा २५ रुपये शुल्क व १०० रुपये अनामत रक्कम द्यावी लागते. हे ग्रंथालय सकाळी ८ ते रात्री ८ पर्यंत खुले असते. जुन्या ग्रंथांचे जतन करण्यासाठी येथे ‘फ्युमिगेशन चेंबर’ ची सोय आहे. त्यात पुस्तके ठेवून त्याला रसायनांची वाफ दिली असता. पुस्तकावरील धूळ व कीड नष्ट होते. हे फ्युमिगेशन चेंबर छोटया आकारचे असल्याने त्यामध्ये मोठया आकाराची पुस्तक ठेवता येत नाहीत.
ग्रंथालयातील ग्रंथाच्या वाढत्या संख्येमुळे इमारतीला धोका निर्माण होण्यची शक्यता लक्षात घेऊन हे ग्रंथालय तिसऱ्या मजल्यावरून तळमजल्यावर नेण्याची योजना आखण्यात आली आहे. ग्रंथालयातील अमूल्य ग्रंथाचे मायक्रोफिल्मिंग करण्याची योजना आहे. मात्र संस्थेकडे पुरेसा निधी नसल्याने महत्वपूर्ण प्रकल्प कसे पूर्ण करावेत, असा प्रश्न संस्थाचालकांपुढे आहे.
भारतीय स्वातंत्र्याला पन्नास वर्ष होत आहेत. अशा वेळी भारतीय संस्कृती आणि इतिहास यांचे संरक्षण व संवर्धन करण्याच्या भवन्सच्या ग्रंथालयाच्या योजनांना देश व संस्कृतीप्रेमींनी सढळ हाताने मदत करावी, एवढीच अपेक्षा.